या गटाचे कोणतेही पदाधिकारी हे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसून येत नाहीत… भाजपला निवडणुकीत फठका बसण्याची शक्यता…..
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रचारात नसल्याने तर्कवितर्कांना उधाण! थेट भाजपाचे केले जातेय शरसंधान!!*
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारात महायुतीतील सदस्य पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोणतेही पदाधिकारी प्रचारात नसल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा चालू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे करमाळ्याचे निरीक्षक व सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भाजपकडून आम्हाला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी कोणतीही विचारणा करण्यात आलेली नसल्याने आम्ही सर्व पदाधिकारी शांत व गप्पा आहोत. भाजपकडून विचारणा नसल्याने आम्ही भाजपचा प्रचार करण्याचा विषयच उद्भवत नसल्याचे संजय घोडके यांनी नमूद केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती आहे. मात्र या तिन्ही पक्षांमध्ये पंढरपूर मतदार संघामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका निश्चितच भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोणतेही पदाधिकारी हे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसून येत नाहीत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भाजपकडून आम्हाला विचारात घेतले जात नसल्याने आम्ही प्रचारात सहभागी झालेलो नाही. मात्र आमची भुमिका तटस्थ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये माननारे ४०-५० हजार मतदार असून, पदाधिकाऱ्यांना विचारात न घेतल्याने १०-१२ हजार मतांचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.