पंढरपूर जिल्हा हिवताप कार्यालयात रिकाम्या खुर्च्या…. ना येण्याची वेळ, ना जाण्याची वेळ….
कार्यालयीन कामाच्या वेळी रिकाम्या खुर्च्या

पंढरपूर – राज्य सरकारी कर्मचार्यांना पाच दिवसांचा आठवडा होऊनही कामकाजाच्या वेळी अनेक जण दांडी मारत आहेत. पंढरपूर जिल्हा हिवताप शासकीय कार्यालय असून, त्यात दुपारनंतर अनेक टेबलवरील कर्मचारी गायब असतात. याबाबत विचारणा केली असता, ते कर्मचारी ‘बाहेर चहा पिण्यासाठी’ गेल्याचे सांगण्यात आले.
शासकीय कर्मचार्यांना पाच दिवस कामकाजाचे करण्यात आले असूनही अनेकजण कामाऐवजी बाहेरच असतात. याबाबत माहिती घेतली असता, सकाळी येताना अनेकजण उशिरा येतात, तर दुपारी नंतर बाहेर गेलेले अनेक कर्मचारी दुसर्या दिवशीच कार्यालयात येत असल्याचे समजले. अनेक कर्मचारी मुख्यालयात न राहता ते आपल्या गावावरून येत आहेत. यामुळे त्यांचे कार्यालयावर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.
शासनाने कामाला गती येण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळा वाढवून पाच दिवसांचा आठवडा केला. सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 या वेळात शासकीय कार्यालये सुरू राहावे, असे स्पष्ट आदेश आहेत; परंतु पंढरपूर जिल्हा हिवताप शासकीय अधिकारी व कर्मचार्यांकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नाही. शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी अजूनही जुन्याच पद्धतीने कामकाज चालवीत आहेत. सकाळी 11 वाजताच्या पुढे येतात आणि 4 वाजताच गायब होतात. यातही उपस्थितीच्या वेळात विविध कारणे सांगून हे कर्मचारी खुर्चीवर राहात नाहीत. या कर्मचार्यांत कधीच वेळेचे गांभीर्य आणि शिस्तपालन होत नसल्याचेच पाहायला मिळत आहे .कामासाठी वारंवार कार्यालयात चकरा मारून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, या कर्मचार्यांना वठणीवर आणण्यासाठी उपाययोजना करावी अथवा सहा दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी आता सामान्य जनतेतून होत आहे.
रजिस्टर नावालाच
शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांना कामकाजाच्या वेळेत कार्यालय सोडावयाचे असेल तर त्याची रजिस्टरमध्ये नोंद आवश्यक असते. मात्र, पंढरपूर जिल्हा हिवताप शासकीय कार्यालयातील रजिस्टर नावालाच असून, त्याचा वापर दिसून येत नाही.
विशेष म्हणजे संबंधित अधिकारीसुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत होते.