रुग्ण हक्क परिषदेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांना प्रदान ….
पुणे – रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्याचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेंद्र भोसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मा. सहा पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काम करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जास्त प्रभाव असतो. समाजाचे हित पर्यायाने लोकांचे हित जोपासण्याचे काम प्रशासकीय अधिकारी म्हणून करण्यासाठी मोठी संधी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून मिळते. महापुरुष सर्वच नागरिकांचे असतात, त्यांनी जन्म घेतलेल्या जातीमध्ये त्यांना बंदिस्त करणे चुकीचे आहे.
भानूप्रताप बर्गे म्हणाले की, पुणे मनपाचे नवनिर्वाचित आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताना राजेंद्र भोसले यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे नियोजन केले. महापुरुषांची जयंती साजरी करत असताना सर्व नियोजन दर्जेदार असावे, मोठ्या उंचीचे असावे हा दृष्टिकोन यावर्षी प्रकर्षाने दिसून आला. राजेंद्र भोसले यांनी याआधीही प्रशासकीय पदांवर असताना सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू म्हणून काम केलेय ते मला जास्त भावलेले आहे, योग्य व्यक्तीला पुरस्कार प्रदान केल्याचे समाधान असल्याचे इथे म्हणाले.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, परिषदेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार याआधीही दर्जेदार व्यक्तिमत्त्वांना दिलेला आहे. पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या रूपाने समस्त पुणेकरांनाच हा पुरस्कार प्रदान केल्याचे समाधान आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड तर कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन अपर्णा मारणे साठ्ये यांनी केले होते. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम, आशिष गांधी आणि रुग्ण हक्क परिषदेचे रवींद्र चव्हाण उपस्थित होते.