चर्मकार समाजातील दीपक नागेश जाधव यांचा जोगेश्वरी पोलीस स्टेशन मध्ये संशयास्पद मृत्यू
सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा जोगेश्वरी पोलीस स्टेशन वरून मोर्चा काढेन.... वैभव गिते
मुंबई :- जोगेश्वरी पोलीस स्टेशनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील दीपक नागेश जाधव (वय 24 वर्ष) या तरुणाचा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले असताना मृत्यू झाला आहे. दीपकचा मृत्यू कसा झाला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून त्याच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे की पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. चर्मकार समाजातील दीपक जाधव हा केटरिंग व्यवसायात काम करत होता, आणि त्याने काही मुला-मुलींना कामावर ठेवले होते. मात्र वेळेवर पगार न मिळाल्याने दीपक आणि त्याच्या कामगारांमध्ये वाद झाला होता. याच प्रकरणावरून दीपक जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. परंतु त्याच रात्री, पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा त्याच्या बहिणीचा दावा आहे.
दिपकच्या बहिणीने स्पष्टपणे सांगितले आहे की पोलिसांच्या मारहाणीमुळेच तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे. पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित जतन करून ठेवणे आवश्यक असताना पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबीयांना दाखवण्यात आलेले नाहीत असे पीडीत कुटुंबीयांनी सांगितले घटनेने कुटुंबात व नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आतापर्यंत भारतीय जनता पार्टी व महायुती मधील कोणताही मंत्री लोकप्रतिनिधी, नगरसेवक,नेते या कुटुंबीयांना भेटलेले नाहीत कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांना जाब विचारलेला नाही. तसेच महाविकास आघाडीचे कोणतेही आमदार नगरसेवक नेतेमंडळी चर्मकार समाजातील या पीडित कुटुंबीयांना भेटलेली नाहीत. टीव्ही मीडिया प्रतिनिधी सर्व काही बघत आहेत परंतु बातमी कोणीही लावत नाही.
मयत दीपक जाधव यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर,पोलीस तपासावर नाराजी व्यक्त करीत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेकडे मदत मागितली आहे.
त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा जोगेश्वरी पोलीस स्टेशन वर मोर्चा काढण्याचा इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी दिला आहे.