ईतर

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

संपादक-राजरत्न बाबर

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी विठ्ठलास चंदनाचा लेप

पंढरपूर:- ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला मंगळवार दिनांक 9 एप्रिल पासून सुरुवात झाली असल्याचे श्रीविठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. प्रतिवर्षी या पूजा भाविकांना देणगी मुल्य आकारून उपलब्ध करून देण्यात येतात. तथापि, गर्भगृह संवर्धनाचे काम सुरू असल्याने, पदस्पर्शदर्शन बंद आहे. त्यामुळे पदस्पर्शदर्शन सुरू होईपर्यंत भाविकांच्या हस्ते पुजा बंद करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या चंदनउटी पुजा मंदिर समिती मार्फत करण्यात येत आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण मोठ्या उत्सवात साजरा*
चैत्र शुध्द 1 हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे नवीन वर्षारंभाचा दिवस आहे. नवीन वर्षानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस नवीन महावस्त्रे परिधान करण्यात आली. मंदिरात सकाळी 8.00 वाजता मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या शुभहस्ते ध्वज पुजन करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ, सहाय्यक विभाग प्रमुख प्रसाद दशपुत्रे व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, श्री संत नामदेव पायरीवरील (महाद्वारावरील) गोपूर, श्री रुक्मिणी उत्तरद्वार गोपुर, या ठिकाणी विधिवत पूजा करून ध्वज लावण्यात आले. सकाळी पंचांग पूजन करण्यात आले. मंदिर समितीचे पुजारी वेद शास्त्र संपन्न समीर कौलगी यांनी पंचांग वाचन केले. या दिवसापासून श्रीं चे महानैवेद्यामध्ये श्रीखंड वापरण्यास सुरवात करण्यात येत असून, दुपारी पोशाखावेळी श्रीं स अलंकार परिधान करण्यात आले.
श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे 5.00 ते सकाळी 11.00 पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या, गुढीपाडवा सणाला भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारात घेऊन, या दिवशी पहाटे 5.00 ते रा.11.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

*अन्नछत्रात वर्धापन दिनांनिमित्त विशेष भोजन प्रसाद*
हिंदू धर्मात अन्नदानाचे महत्व अनन्य साधारण आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे.
मंदिर समितीचे श्री संत तुकाराम भवन येथे विनामूल्य अन्नछत्र सुरू असून, या अन्नछत्राचा सन 1996 पासून गुढीपाडव्याचया शुभ मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला आहे. आज अन्नछत्राचा वर्धापन दिन असल्याने विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नछत्रामध्ये दु.12.00 ते 2.00 व रा.7.00 ते 9.00 या वेळेत मोफत पोटभर भोजनप्रसाद भाविकांना उपलब्ध करून देतो, त्याचा दैनंदिन 2500 ते 3000 भाविक प्रसादाचा लाभ घेतात. आज वर्धापन दिनांनिमित्त मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या शुभहस्ते पुजा करून भाविकांना भोजन प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख राजेश पिटले, बलभिम पावले, सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते. यां अन्नछत्रामध्ये अन्नदान करण्यासाठी विविध योजना असून इच्छुक भाविकांना कार्यालयात संपर्क करून अधिक माहिती जाणून घेता येईल.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close